सुळगे (ये.) : येथील द. म. शि. मंडळ संचालित नेताजी हायस्कूलच्या सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर होते. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ‘झुलवा पाळणा’ या गीताने झाली. या गीतातून शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग उलगडत सभागृहात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन अध्यक्ष श्री. भोगण सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कन्नड शिक्षक श्री. एस. एस. केंगेरी यांनी श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर कुमारी श्रुती भाऊराव होनगेकर, कुमारी सेजल मधुकर थोरवत, कुमारी राणी रामा इंगळे, कुमारी करुणा रमेश गडकरी आणि प्रिया श्रीकांत पाटील या विद्यार्थिनींनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.

कुमारी करुणा रमेश गडकरी हिने सादर केलेल्या शिवस्तुतीगीताने उपस्थितांच्या मनात शिवभक्तीची भावना अधिक दृढ केली.

समाज विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. एम. पी. कंग्राळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवजयंती उत्सवाची सुरुवात समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. सन १८९५ मध्ये प्रथम सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांचे शौर्य, गनिमी कावा, दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्य यांची नोंद भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही संपूर्ण देशावर असून, त्यांच्या जयंतीचा उत्सव भारतासह जगभर अभिमानाने साजरा केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय समारोपात श्री. टी. वाय. भोगण सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडत त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. ए. कंग्राळकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सुजाता व्हंडेकर मॅडम यांनी केले.