बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील वाढत्या चाकू भोसकाभोसकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग पथकांपैकी एका पथकाने काल मंगळवारी सुभाषनगर येथे एका इसमाला अटक करून त्याच्याकडील तलवार जप्त केली. पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव जुबेर अब्दुलवहाब शेख (वय ३६, रा. सहावा क्रॉस आझादनगर, बेळगाव) असे आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर हा काल मंगळवारी सुभाषनगर येथील मराठा मंडळ कॉलेज शेजारील हॉस्पिटलकडे संशयास्पदरित्या जात होता. त्यामुळे मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला अडवून चौकशी केली. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्या हातातील पोत्यामध्ये प्राणघातक तलवार आढळून आली. परिणामी पोलिसांनी तलवार जप्त करून जुबेर शेख याला अटक केली. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.