• पोलीस खात्यातर्फे २४ तास लक्ष ठेवण्यासाठी १५ जणांची विशेष टीम

बेळगाव / प्रतिनिधी

सोशल मीडियावर भडकावणारे संदेश किंवा समाजात तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. या प्रकारच्या पोस्टवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत असून १५ कर्मचाऱ्यांची विशेष पथक रात्रंदिवस सोशल मीडियावर नजर ठेवणार आहे.

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या मिरवणुका शांततेत पार पडल्याबद्दल सर्व समाजघटकांचे त्यांनी आभार मानले. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही जण सोशल मीडियावरून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बोरसे म्हणाले, “प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण समाजात तेढ निर्माण करणाऱ्या किंवा भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकण्याचा अधिकार कुणालाही नाही.” प्रक्षोभक संदेश पाठविणाऱ्यांना पोलिसांकडून त्याच प्लॅटफॉर्मवर त्वरित नोटीस पाठवली जाईल. तसेच अशा पोस्टमुळे गोंधळ झाल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहेत. गुरुवारपासून ही विशेष तपासणी मोहीम सुरू होत असून, कुणीही अभद्र भाषेचा वापर करून लोकांच्या भावना भडकवू नयेत यासाठी पोलिसांची ही यंत्रणा सज्ज असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.