• पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा इशारा

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या, १ नोव्हेंबर रोजी, बेळगाव शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने सुरक्षा नियोजन आणि मार्गदर्शक सूचनांची माहिती पत्रकार परिषदेत जाहीर केली.

यावेळी माहिती देताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, मिरवणूक व कार्यक्रमांसाठी १८० अधिकारी, २,३०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, १० केएसआरपी तुकड्या, ८ सशस्त्र रिझर्व्ह तुकड्या आणि १० ड्रोन तैनात केले जात आहेत. शहरातील वाहतूक नियोजनासाठी सरदार मैदान, सीपीईडी ग्राउंड, महिला पोलीस स्टेशन मागील मैदान आणि कोर्ट कॉम्प्लेक्स परिसर सार्वजनिक पार्किंगसाठी खुला करण्यात आला आहे.

जड वाहनांना १ नोव्हेंबर रोजी शहरात प्रवेश बंदी राहणार असून, राज्योत्सव पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी राणी चन्नम्मा सर्कल येथे विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करण्याचे आदेश आयोजकांना देण्यात आले असून, प्लाझ्मा म्युझिक सिस्टीम आणि लेजर लाईट्सचा वापर पूर्णपणे बंद असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मिरवणुकीतील पथकांना फक्त १० मिनिटे थांबण्याची मुभा असेल. मिरवणुकीत महिला आणि मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर राहणार असल्याने, मोठ्या आवाजातील संगीतामुळे होणारी गैरसोय टाळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.

कार्यक्रमस्थळी पोलिस विभागाचे शिस्त नियंत्रण पथक तसेच दारू व अंमली पदार्थ तपासणी पथक तैनात केले जाईल. दारू किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून उत्सवाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा त्यांनी दिला.