बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये राज्यस्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत ५२ संघटनांच्या सदस्यांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी सांगितले की, सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा दिसून येते. यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले. व्यायाम आणि क्रीडा उपक्रम आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि विविध क्रीडा स्पर्धांद्वारे व्यायामाची सवय वाढवता येते. त्यामुळे अशा स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवारी युनियन जिमखाना येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक उपस्थित होते. उद्घाटनात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अधिवक्ता विनय मांगलेकर, तसेच सदस्य ॲड. के. बी.नायक, मगदूम, कमलेश केवाडा यांनी रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना आसिफ सेठ यांनी बार असोसिएशनच्या उपक्रमांचे कौतुक केले. क्रिकेट खेळाडूंना विजय-पराभवाचा अनुभव देतो तसेच सहकाऱ्यांच्या कुटुंबांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होते, असे ते म्हणाले. याशिवाय खेळांमुळे नेतृत्वगुण विकसित होतात आणि संघभावना वृद्धिंगत होते, असेही त्यांनी नमूद केले.








