बेळगाव / प्रतिनिधी
गुरलापूरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या सततच्या निदर्शनांना पाठिंबा देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बेळगावमध्ये राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हे सरकार उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले.
आज बेळगावमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना तात्काळ प्रतिसाद द्यावा. हजारो शेतकरी निदर्शने करत आहेत. जबाबदार सरकारने कसे वागावे हे त्यांनी समजून घेतले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. “जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो तेव्हा त्यांनी कोणत्याही पक्षाशी संलग्नता न ठेवता त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे,” असे विजयेंद्र म्हणाले. “मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आठवण करून देऊ इच्छितो. यापूर्वी बेळगावमध्ये शेतकरी विठ्ठल अरबावी यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी येडियुरप्पा यांनी लढा दिला होता आणि प्रतिटन १५० रुपये अतिरिक्त दरवाढ केली होती,” असे सांगून त्यांनी एका जुन्या घटनेची आठवण करून दिली.
मी मुसळधार पावसात कल्याण कर्नाटकला गेलो आहे. मंत्री आणि अधिकारी नुकसानभरपाई देण्यास तत्पर नाहीत. सरकारने शेतकऱ्यांच्या निषेधांना अजिबात प्रतिसाद दिलेला नाही. राज्यात ६ दशलक्ष टन ऊस गाळला जातो. यामुळे सरकारला ५५,००० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तथापि, काँग्रेस सरकारला ऊस उत्पादकांची किती काळजी आहे असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. साखर कारखान्यांचे मालक कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. मी शेतकरी नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा म्हणून आलो आहे. राज्य सरकारने पुढे येऊन चर्चा करावी. अन्यथा, आम्ही सरकारचे कान टोचण्याचे काम करू असेही विजयेंद्र म्हणाले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, आमदार अभय पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि भाजप नेते तसेच आजी – माजी आमदार याप्रसंगी उपस्थित होते.








