बेळगाव / प्रतिनिधी

कॅम्पमधील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर मराठी विद्यानिकेतन स्कूल आयोजित चव्हाट गल्ली – फुलबाग गल्ली क्लस्टर प्राथमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात सेंट पॉल, मुलीच्या गटात सेंट जोसेफ शाळेने विजेतेपद पटकाविले. मुलीच्या गटातील अंतिम लढतीत सेंट जोसेफ शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा पेनाल्टी शूटआउटवर ३-२ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने मराठी विद्यानिकेतनचा १-० असा पराभव केला. विजयी संघाच्या यश पाटीलने एकमेव गोल केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल शाळेने इस्लामिया शाळेचा २-० असा पराभव केला, अंतिम लढतील सेंटपॉल शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा ३ – ० असा पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विजेते संघ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेच्या समारंभाला बक्षीस प्रमुख पाहुणे मराठी विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. पाटोल, स्पर्धा सचिव दत्ता पाटील, महेश हगोदळी, रवी मालशेट, नागराज भगवंतण्णावर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघाना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मानस नायक, मीनाक्षी जाधव, ज्युलेट फर्नाडिस आदी उपस्थित होते.