- मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र महोत्सव महामंडळाच्या बैठकीत चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात विजयादशमीच्या दिवशी निघणाऱ्या पारंपरिक सीमोल्लंघन मिरवणुकीत गर्दीचे योग्य व्यवस्थापन करून शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले. जत्तीमठ येथे पार पडलेल्या मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत सांगण्यात आले की, ज्योती कॉलेज मैदानावरील सीमोल्लंघन कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असल्यामुळे पालख्यांचे दर्शन घेणे नागरिकांना कठीण जाते. यावर तोडगा म्हणून यावर्षी प्रत्येक पालखीला स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.
तसेच शहरातील दुर्गादेवी मंडळांनी आपापल्या समस्या बैठकीत मांडल्या असून, त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीला मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, आनंद आपटेकर, दत्ता जाधव, अजित कोकणे, परशुराम किणेकर, सुरेश पिसे, मल्लेश चौगुले, प्रमोद बिर्जे, आनंद पुजारी, सुधीर मोरे, दीपक खटावकर, बळवंत शिंदोळकर, सुनील बोकडे, अंकुश केसरकर, किरण हुद्दार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
