- बेळगावात महिला काँग्रेसकडून प्रतिमेला दुग्धाभिषेक : देवराज अर्स यांचा विक्रम मोडला
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिवंगत देवराज अर्स यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम मागे टाकल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महिला काँग्रेसच्या वतीने आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आपला आनंद व्यक्त केला. काँग्रेस नेत्या आयेशा सनदी यांनी भावना व्यक्त करताना सिद्धरामय्या यांचा उल्लेख ‘अण्णा रामय्या, भाग्या रामय्या आणि कर्नाटकचा वाघ’ असा केला. धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे नेतृत्व करणारे सिद्धरामय्या भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या जनतेसाठी अनेक लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केले असून, पुढील काळातही त्यांनी जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू ठेवावे, असे मत यावेळी मांडण्यात आले.
या जल्लोषात भारती पाटील, कस्तुरी भांवी, फरीदा नदाफ, मीनाक्षी बेळगाव यांच्यासह अनेक महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








