बेळगाव / प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे आठवे पुष्प संपन्न झाले. यावर्षी नवरात्र उत्सवाचे अकरा दिवस असल्याने नेहमीच्या मार्ग बरोबर छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथून सुरुवात होऊन श्री शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली. 

प्रारंभी सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक घालून आरती करण्यात आली. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून धारकरी गणेश जांगळे यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दुर्गामाता दौडीला सुरुवात करण्यात आली. ही दौड कपिलेश्वर उड्डाणपूल, हेमू कलानी चौक, टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली मार्गे श्री शंभुतीर्थ येथे पोहोचली. यावेळेस हृदय दिवस असल्याकारणाने अरिहंत हॉस्पिटलचे हृदयरोग, तज्ञ डॉ. माधव दीक्षित हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शिवभक्तांना हृदयविकार तसेच तंदुरुस्त जीवनशैली यासाठी आपले मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची आरती करण्यात आली. आणि प्रमुख पाहुणे डॉ.माधव दीक्षित यांच्याहस्ते ध्वज उतरून या दौडीची सांगता करण्यात आली.

तसेच प्रतिवर्षीप्रमाणे नवमीच्या दिवशी ताशिलदार गल्ली विभागातल्या दौडीप्रसंगी स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या शिलेदारांचे वंशज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. यावर्षी श्रीमंत राजे अमरसिंह उदयसिंग जाधव राव हे उपस्थित राहणार आहेत. श्रीमंत राजे लखोजीराव जाधवराव सिंदखेडराजा, (राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे वडील) यांचे ते थेट १६ वे वंशज आहेत. तसेच सरसेनापती धनाजीराव शंभूसिंग जाधवराव यांचे ते थेट १२ वे वंशज होत.