- महाराणी मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत कल्याणी बेंगळुरू ब्लास्टर्सवर ६ गड्यांनी मात
- बेळगावच्या श्रेयाची प्रभावी कामगिरी
बेळगाव : बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या महाराणी महिला क्रिकेट स्पर्धेत हुबळी टायगर्स संघाने कल्याणी बेंगळुरू ब्लास्टर्सवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. या सामन्यात बेळगावच्या श्रेया पोटे हिने प्रभावी गोलंदाजी करत तीन महत्त्वाचे बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
प्रथम फलंदाजी करताना कल्याणी बेंगळुरू ब्लास्टर्स संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १५८ धावा उभारल्या. हुबळी टायगर्सकडून श्रेया पोटे हिने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ षटकांत ३२ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. तिच्या या दमदार कामगिरीमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हुबळी टायगर्सच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळीचे दर्शन घडवत १९.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले आणि स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली. श्रेयाला कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य व धारवाड विभागीय क्रिकेट समितीचे माजी समन्वयक अविनाश पोतदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.








