• शहर महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या कन्नडसक्तीच्या विरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे.

कन्नडसक्ती विरोधात ११ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी रामलिंगखिंड गल्ली येथील रंगूबाई पॅलेस येथे शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर मालोजी अष्टेकर होते. यावेळी अष्टेकर यांनी मोर्चामध्ये शहराच्या सर्वच भागांतून महिला व कार्यकर्ते अधिक संख्येने सहभागी व्हावेत, यासाठी आपल्या परिसरात बैठक घेऊन जनजागृती करावी. मराठी भाषेच्या रक्षणासाठी सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर पक्षांत असलेल्या कार्यकर्त्यांनीही मोर्चामध्ये सहभागी होऊन मराठीसाठी आपली ताकद दाखवून दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

रणजित चव्हाण-पाटील यांनी प्रास्ताविक करताना येणाऱ्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी अधिक आक्रमकपणे भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी कमी दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आतापासूनच जनजागृतीला सुरुवात करावी, असे सांगितले.

समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी सीमाभागात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील आमदार व खासदारांनी जोरदार आवाज उठविला पाहिजे, यासाठी पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. मोर्चामध्ये अधिक संख्येने युवा वर्ग सहभागी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी मदत केली.

ॲड. अमर यळ्ळूरकर यांनी महापालिकेकडून चुकीच्या पद्धतीने कन्नडसक्ती लादली जात आहे. या विरोधात रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढाई तीव्र केली जाणार आहे, अशी माहिती दिली.

माजी नगरसेवक नेताजी जाधव, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, रणजित हावळान्नाचे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला विकास कलघटगी, मोतेश बार्देशकर, सूरज कुडचकर, राजू कदम, प्रकाश नेसरकर, शिवराज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • जिल्हाधिकाऱ्यांसमवेत दोन दिवसांत बैठक : 

कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त नारायण बरमनी यांनी सोमवारी ‘मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. तसेच मराठी भाषिकांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली जाणार आहे. तसेच दोन दिवसांत बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती दिली. जोपर्यंत कन्नडसक्ती मागे घेऊन मराठी भाषेला योग्य ते स्थान दिले जात नाही, तोपर्यंत मराठी भाषिक आपली लढाई लढणार आहेत. तसेच, ११ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढला जाईल. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीवेळी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील आदी उपस्थित होते.