बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी आयुष्यभर झुंजारपणे संघर्ष करणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना आज बेळगावमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आयोजित शोकसभेत दळवींच्या पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या सीमालढ्यातील संघर्षाचा गौरव करण्यात आला.

शोकसभेत बोलताना मान्यवरांनी दळवींच्या प्रखर नेतृत्वाचा उल्लेख केला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणसांच्या अस्मितेसाठी त्यांनी दिलेला लढा, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता सीमाप्रश्न जिवंत ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा, हे सांगितले गेले. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतरही ते खचले नाहीत, उलट त्यांनी आपला लढा अधिक तीव्र केला, अशी आठवण उपस्थितांनी काढली.

ॲड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, “दळवी हे चळवळीतील एक तळमळीचे नेते होते. त्यांनी कायदेशीर बाजू अत्यंत ताकदीने उचलून धरली. मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा सदैव स्मरणात राहील.” तर युवा समितीचे सागर पाटील यांनी दळवींच्या शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दळवींच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत सांगितले, “कार्यकर्त्यांशी एकरूप होऊन राहणारा हा मनमिळावू नेता होता. त्यांनी संघटना एकजूट ठेवण्यासाठी जो संदेश दिला, तोच आता त्यांच्या पश्चात आपण सर्वांनी पाळणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” शिवसैनिक संजय मोरे यांनीही दळवींच्या स्मृतींना उजाळा दिला.

या शोकसभेला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर नागेश सातेरी, खानापूर म.ए. समितीचे गोपाळ देसाई, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी नगरसेवक टी.के. पाटील, धनंजय जाधव, मदन बामणे आणि गजानन पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.