• दुर्गामाता दौडचा चौथा दिवस
  • ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत : मराठी संस्कृतीचे दर्शन

बेळगाव / प्रतिनिधी

भगव्या पताकांनी सजवलेल्या मार्गांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात गुरुवारी (दि.२४) रोजी बेळगावात चौथ्या दिवशी दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून दौडीची सुरुवात झाली. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. प्रेरणामंत्राच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले आणि मिरवणूक मार्गस्थ झाली. किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, पांगुळ गल्ली, कांदा मार्केट, कसाई गल्ली, कामत गल्ली, पी.बी. रोड, मार्केट पोलीस स्थानक, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली अशा प्रमुख मार्गांवरून दौड पुढे गेली.

याप्रसंगी संजय भातकांडे यांनी सांगितले की, किरण गावडे यांनी भगवा रक्षक संघटनेची स्थापना करून सुरुवातीला क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या. पुढे संभाजी भिडे गुरुजींच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्गदर्शनाखाली दुर्गामाता दौडीची सुरुवात झाली. सर्व समाजघटक यामध्ये सहभागी होत असून तरुणांमध्ये देशभक्ती, धर्मरक्षण आणि जबाबदार नागरिक होण्याची जाणीव निर्माण करण्याचे हे माध्यम ठरते, असे त्यांनी नमूद केले.

भातकांडे पुढे म्हणाले की, दुर्गामाता दौड ही बेळगावातील सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण पिढीपर्यंत सर्वांचा सहभाग उत्स्फूर्त असतो. तरुणांनी व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी आवाहन केले.

विश्वजीत हजबे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान अंगीकारून देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

सरदार ग्राउंड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खुट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली या मार्गे दौड संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात दाखल झाली. येथे मान्यवरांच्या हस्ते आरती करून ध्येयमंत्र पठणानंतर ध्वज उतरवून चौथ्या दिवसाची सांगता करण्यात आली.

दरम्यान, शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी खासबाग येथून पुढील दिवशीची दौड सुरू होणार असून, विविध मार्गांवरून वडगाव येथील श्री मंगाई मंदिरात दौडीची सांगता होणार आहे.