• लोकप्रतिनिधींकडून होणार शिवजयंती मिरवणूक मार्गाची पाहणी

बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, २१ एप्रिल रोजी होणारा हा सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी मिरवणूक मार्गावरील मूलभूत सुविधांचा आढावा महापौर आणि उपमहापौर लवकरच घेणार आहेत.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, साहित्यिक गुणवंत पाटील आणि प्रसाद मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत मिरवणूक पाहण्यासाठी गॅलरी, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

रात्रभर चालणाऱ्या मिरवणुकीदरम्यान शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी उपहारगृहे सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी सूचनाही या बैठकीत मांडण्यात आली. तसेच पोलीस, हेस्कॉम आणि आरोग्य विभागाच्या समन्वयासाठी आपत्कालीन मदत केंद्र कार्यान्वित करण्यावरही एकमत झाले.

महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी सर्व मागण्यांची दखल घेऊन लवकरच प्रत्यक्ष मिरवणूक मार्गाची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या बैठकीस संतोष पेडणेकर, गिरीश धोंगडी, जयतीर्थ सौंदती, श्रीयेश नाकाडी आणि रमेश सोनटकी यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.