• स्पर्धा व मिरवणूक नियोजनावर चर्चा

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात दरवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सवात शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित आकर्षक सजीव देखावे सादर केले जातात, ज्यामुळे बेळगावकरांचे लक्ष वेधले जाते.

याच पार्श्वभूमीवर श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी उद्या रविवारी, दिनांक १२ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक धर्मवीर संभाजीराजे चौकातील दुर्गादेवी मंदिर, जत्तीमठ येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

या बैठकीत शिवजयंती चित्ररथ स्पर्धेचे आयोजन, मिरवणूक मार्गावरील विविध समस्या तसेच उत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबतही विचारमंथन होणार आहे.

या बैठकीस शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, साहित्यिक गुणवंत पाटील, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, उपाध्यक्ष प्रसाद मोरे, संतोष कणेरी, रवींद्र जाधव, विनायक बावडेकर, अरुण पाटील, निहाल शहापूरकर, आदित्य पाटील व आकाश हांडे यांनी केले आहे.