बेळगाव / प्रतिनिधी
क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला केलेल्या टोळक्यातील सात जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली असून अद्याप दोघे फरार आहेत. शिवाजीनगर, बेळगाव येथील साई मंदिराजवळकुणाल राजेंद्र लोहार (वय २१) या युवकावर गुरूवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी कामावरून घरी जाताना त्याला अडवून हल्ला करण्यात आला होता. स्थानिक लोक जमा होण्याआधीच हल्ला करणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढला होता.
सदर हल्ल्याची माहिती मिळताच रात्री उशिरापर्यंत मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करून मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश धामन्नावर आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करून सुदर्शन रामा पाटील (वय १९, लक्ष्मी गल्ली, भुतरामनहट्टी), भीमराया हलप्पा गुंजगी (वय २३, रा. भुतरामनहट्टी), दुर्गाप्पा सत्यप्पा पाटील (वय २१, रा. भुतरामनहट्टी), सचिन भीमराया कातबळी (वय २१, रा. भुतरामनहट्टी), प्रकाश संभाजी लोहार (वय २५, रा. भुतरामनहट्टी), श्रीधर रायप्पा होंडाई (वय ३१, रा. भुतरामनहट्टी) आणि राकेश हुल्याप्पा बुडागा रा. वाल्मिकी गल्ली, मुत्यानट्टी, बेळगाव) अशा सात जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या तरुणांवर गुन्हा क्रमांक १६०/२०२५ अंतर्गत भा.द.वि. कलम १८९ (२) , १९१ (२), १९१ (३), १०९, ११८(१), ११५ (२), ३५२, ३५१ (३) आणि १९० – २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे देखील जप्त केले असून त्यामध्ये एक रॉड, केबल वायर, एक पल्सर मोटरसायकल आणि गुन्ह्याशी संबंधित ८०,००० हजार रुपये रोख यांचा समावेश आहे. सध्या फरार असलेल्या उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
हल्ला करण्यापूर्वी या सात जणांनी आपल्या दोन अज्ञात साथीदारांसह प्रथम कुणालला दोरीने ओढले, त्यानंतर सुदर्शनने धातूच्या रॉडने त्याच्या डोक्यावर तसेच भीमराया याने केबल वायरने त्याच्या पाठीवर हल्ला केला. इतरांनीही हल्ल्यात सामील होऊन कुणाल याला गंभीरित्या जखमी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.