• जिल्हा सत्रन्यायाधीश मंजुनाथ नायक

बेळगाव / प्रतिनिधी

राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने राजा लखमगौडा विधी महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली.

ते म्हणाले की, भारताच्या संविधानाची मसुदा प्रक्रिया ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाली आणि दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या कालावधीनंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारण्यात आले.

मंजुनाथ नायक यांनी स्पष्ट केले की, संविधानातील मूलभूत कर्तव्ये नंतर समाविष्ट करण्यात आली. १९७६ मधील ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे १० कर्तव्यांचा समावेश झाला आणि नंतर २००२ मध्ये ८६व्या घटनादुरुस्तीनुसार मुलांना शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य म्हणून जोडले गेले. “शिक्षणाचा अधिकार हा जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच तो प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे,” असा त्यांनी ठाम संदेश दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. एल. लॉ कॉलेजच्या शासक मंडळाचे अध्यक्ष अधिवक्ता आर. एस. मुतालिक होते. कायद्याचे विद्यार्थी राजकीय व सामाजिक जाणीवा जोपासून कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि प्राधिकरणाचे सदस्य सचिव संदीप पाटील, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार उपस्थित होते. प्रा. चेतन कुमार टी.एम. यांनी स्वागत केले आणि विद्यार्थी समन्वयक सचिन कोटागी यांनी आभार मानले.