बेळगाव / प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीची नुकसानभरपाई वेळेत न दिल्याबद्दल बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यावर न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे. न्यायालयीन आदेशानुसार गुरुवारी त्यांच्या वापरातील सरकारी वाहन जप्त करण्यात आले. शेतकऱ्यांना देय असलेली ९० लाख रुपयांपेक्षा अधिक भरपाई अद्याप अदा न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

बैलहोंगल तालुक्यातील कुलावल्ली गावातील शेतकऱ्यांची सुमारे २१ एकर जमीन शासकीय कारणांसाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीवर कात्रीदंडी येथे विविध सरकारी कार्यालये व पशुसंवर्धन विभागाच्या इमारती उभारण्यात आल्या असून अनेक वर्षांपूर्वीच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनाच अपेक्षित भरपाई मिळालेली नाही.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर बैलहोंगल न्यायालयाने प्रति एकर ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तरीही दीर्घकाळ लोटूनही आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयाने जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. सरकारी वकील मीसाळे यांनी आदेश न पाळल्यास सीईओंची गाडी, कार्यालयीन संगणक व इतर साहित्य जप्त केले जाईल, असे स्पष्ट केले होते.

पीडित शेतकरी महेंद्र रावसाहेब देसाई यांनी सांगितले की, १९८९ मध्ये दिलेल्या जमिनीपैकी ५ एकर जमिनीची भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश असूनही रक्कम मिळालेली नाही. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पुढील कायदेशीर लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.