- विजयपूर तालुक्यातील घटना
विजयपूर / वार्ताहर
विजयपूर तालुक्यातील मिंचनाळ तांडा (मादेव नगर) येथे खेळता खेळता शेततळ्यात पडल्याने तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवम्मा राजू राठोड (वय ८), कार्तिक विश्वा राठोड (वय ७) आणि स्वप्ना राजू राठोड (वय १२) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.दुपारच्या सुमारास मुले मेंढ्यांसोबत खेळत शेताच्या दिशेने गेली होती. खेळण्याच्या ओघात त्यांचा तोल जाऊन तिन्ही मुले शेततळ्यात पडली आणि बुडाली.
दरम्यान या घटनेनंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता काही वेळानंतर तिघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चेनगोंडा तसेच विजयपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकाचे अधिकारी करीत आहेत.