खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील शेडेगाळी गावात आज शुक्रवार (दि. २०) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास देवाप्पा महादेव गुरव (वय ४८) यांचा हालात्री नदीत बुडून मृत्यू झाला.

माहितीनुसार, देवाप्पा गुरव हे आपल्या मुलासह शेतीसाठी पाणी घेण्यासाठी गेले होते. पंपसेट सुरु केल्यावर घरात गॅस येऊन मुलगा परतला. त्यावेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पंप बंद पडला. पंप चालू करण्यासाठी देवाप्पा गुरव नदीकाठी गेले असता पाय घसरून ते पाण्यात पडले.

त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडाले. मोबाईल शेतातच असल्यामुळे मुलाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्यावर मुलाने शोध सुरू केला आणि वडील दिसून न आल्यामुळे तात्काळ नातेवाईकांना माहिती दिली.

खानापूर पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर देवाप्पा यांचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीस पाठवला आणि नंतर नातेवाईकांना सुपूर्द केला. रात्री 9.00 वाजता शेडेगाळी गावात अंत्यसंस्कार पार पडले. देवाप्पा गुरव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. या आकस्मिक घटनेमुळे शेडेगाळी परिसरात हळहळ पसरली आहे.