बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालपत्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका मुलीला आमिष दाखवून तिचे शोषण केल्याचा गंभीर आरोप न्यायालयात सिद्ध झाला आहे.
मार्च २०२३ मध्ये ही घटना घडली होती. मण्णूर (ता. बेळगाव) येथील रहिवासी असलेल्या रामा मुकुंद तरळे याने शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गाठले. तिला ‘कार चालवायला शिकवतो’ असे सांगून आपल्या वाहनात बसवून घेतले आणि तिच्याशी अश्लील वर्तन करून लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतर काकती पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पीआय किरणकुमार तावरगी यांनी केला आणि पुराव्यानिशी तातडीने दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी भक्कम युक्तिवाद करत आरोपीचे कृत्य सिद्ध केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने रामा तरळे याला दोषी ठरवत पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रकरणाचा छडा लावून गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष मेहनत घेणारे एसीपी गंगाधर टी. एम., पीआय किरणकुमार तावरगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी जाहीर कौतुक केले आहे.








