• रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना ठोठावला ५ हजारांचा दंड

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वॉर्ड क्रमांक ४४ मध्ये स्वतः मनपा आयुक्तांनी अचानक भेट देत ‘सिटी राउंड’ केला आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली. संबंधितांना जागेवरच ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी सकाळी मार्केट परिसराची पाहणी केली. यावेळी काही व्यावसायिक व नागरिकांनी कचरा कुंडीचा वापर न करता थेट रस्त्यावर कचरा फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या या प्रकाराबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांकडून तात्काळ दंड वसूल करण्याचे आदेश दिले.

या कारवाईवेळी वॉर्डाचे नगरसेवक आनंद चव्हाण, पर्यावरण अधिकारी हनुमंत कलादगी तसेच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. “दंड आकारणे हा उद्देश नसून शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत आयुक्तांनी नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

मार्केट परिसरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहरात कुठेही अस्वच्छता आढळल्यास यापुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पालिकेकडून देण्यात आले आहेत. या अचानक कारवाईमुळे बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, जागरूक नागरिकांकडून आयुक्तांच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.