• हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी ; उपवास फराळाचे दिवसभर वाटप

बेळगाव / प्रतिनिधी

सालाबादाप्रमाणे यंदाही शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत महाशिवरात्र भक्तीभावात साजरी करण्यात आली. मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्याला मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.

गेल्या २८ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून येथे महाशिवरात्र उत्सव साजरा केला जात असून यंदाही मध्यरात्री व पहाटे अभिषेक, पूजा आणि आरती विधीवत पार पडले. भारतनगर येथील भक्ती महिला मंडळाच्या भजन कार्यक्रमाने वातावरण अधिक भक्तिमय झाले.

दुपारी अकरा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत भाविकांसाठी उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला. उपासाची खिचडी, केळी, द्राक्षे, राजगिराचे लाडू आदी पदार्थांचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.

यावेळी बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी तसेच नगरसेवक नितीन जाधव यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने महापौर मंगेश पवार, वाणी जोशी, नितीन जाधव, स्मशानभूमीतील महापालिकेचे रखवालदार राजेश बंस, राजन अनगोळकर तसेच विजय सावंत आणि शंकर पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.