• चिटफंडच्या व्यवहारातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड
  • सुसाईड नोटमुळे समजले कारण

बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर जोशीमळा परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या चिटफंड व्यवहारातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृत संतोष कुराडेकर यांच्याकडून एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, संतोष कुराडेकर हा गेल्या २५ वर्षांपासून जोशीमळा परिसरात वास्तव्यास होता. त्यांनी अनेकांना चिटफंड व्यवहारात गुंतवले होते. त्यांनी अनेकांकडून पैसेही उचलले होते. परतफेड वेळेत शक्य झाली नव्हती. विशेष म्हणजे वडगावच्या राजू कुडतरकर या सोनाराकडे ५०० ग्रॅम सोने दिले होते. मात्र सोनाराने सोने परत देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. विशेष म्हणजे संतोष कुराडेकर गाव सोडून पळून गेल्याची अफवा देखील पसरवली होती. अशा मानसिक त्रासाला कंटाळूनच आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे. राजू कुडतरकरकडून सोने वसूल करून संबंधित लोकांना परत द्यावे असाही मजकूर सोसाईड नोटमध्ये नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी शहापूर निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी अधिक तपास करत आहेत.