• आमदार जयंत पाटील यांची मागणी
  • मराठी बांधवांच्या हितरक्षणासाठी सरकारला इशारा

मुंबई : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत गाजला. इस्लामपूरचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हितरक्षणासाठी सरकारने केवळ चर्चेत न थांबता ठोस आणि कायदेशीर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी केली.

विधानसभेत सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित करताना पाटील यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. “दरवर्षी सीमावादावर चर्चा होते; मात्र सर्वोच्च न्यायालयात खटला तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस प्रयत्न दिसत नाहीत,” असे ते म्हणाले.

सीमाप्रश्नी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला बळकटी देण्यासाठी तात्काळ विशेष वकिलाची नियुक्ती करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी जलदगतीने व्हावी यासाठी सरकारने प्रभावी पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्यायासाठी अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, असे सांगत सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या हिताचे रक्षण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. सीमावादावर केवळ चर्चा नको, तर निर्णायक कृती हवी, असा ठाम संदेश जयंत पाटील यांनी सभागृहातून दिला.