- खासदार धैर्यशील माने यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादासंदर्भातील मूळ दाव्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारी रोजी होणार असून, त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका निश्चित करण्यासाठी तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनेही मुख्यमंत्री, सीमा समन्वय मंत्री, तज्ज्ञ तसेच उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर खासदार माने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठासमोर झाली होती. त्यावेळी मूळ दाव्याची अंतिम सुनावणी २१ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली होती.
आगामी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ वकिलांशी चर्चा, आवश्यक कागदपत्रे व साक्षीदारांची शपथपत्रे तयार करणे तसेच कायदेशीर रणनीती निश्चित करण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक घेणे आवश्यक असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.








