• येळ्ळूरवासियांकडून अजितदादांना श्रद्धांजली

येळ्ळूर / वार्ताहर

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे. सहकार, कृषी आणि जलसिंचन क्षेत्रात दूरदृष्टीने राबवलेल्या योजनांमुळे विकासाभिमुख ओळख निर्माण करणारे, तसेच सीमाप्रश्नाची सखोल जाण असलेले अष्टपैलू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना येळ्ळूर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आली. मराठी भाषिकांनी एकजूट राखून मराठी भाषेचे संवर्धन करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे एपीएमसी सदस्य वामनराव पाटील होते. प्रारंभी वामनराव पाटील व लक्ष्मी मासेकर यांच्या हस्ते अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविकात प्रकाश अष्टेकर यांनी सीमाभागातील मराठी संस्थांना आर्थिक बळ मिळावे यासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याचा उल्लेख केला. सीमाप्रश्नाकडे त्यांचे सातत्याने लक्ष होते, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते दत्ता उघाडे यांनी अजितदादांच्या नेतृत्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. काँग्रेसतर्फे आण्णा हणमंत पाटील यांनी सीमाप्रश्नासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज अधोरेखित केली. भाजपचे अरविंद पाटील यांनी अजितदादा हे अत्यंत शिस्तप्रिय नेते असून सकाळी सहा वाजल्यापासून कार्यात मग्न राहत असत, अशी आठवण सांगितली.

समाज सारथी सेवा संघाचे अध्यक्ष सी. एम. गोरल यांनी अजितदादा दिलखुलास, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या जाण्याने आपण पोरके झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. दुद्दापा बागेवाडी, राजू पावले आदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात वामनराव पाटील यांनी पवार कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण येळ्ळूर गाव सहभागी असल्याचे सांगितले.

या सर्वपक्षीय शोकसभेला माजी तालुका पंचायत सदस्य चांगदेव परीट, नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव सायनेकर, ब्रह्मलिंग सोसायटीचे नेताजी गोरल, स्वामी विवेकानंद सोसायटीचे प्रकाश पाटील, डॉ. तानाजी पावले, ग्रामपंचायत सदस्य दयानंद उघाडे, राकेश परीट, पिंटू चौगुले, विलास बेडरे, सतीश देसूरकर, शशिकांत धुळजी, कल्लापा मेलगे, अनुसया परीट, श्रीमती रेणुका मेलगे, नारायण काकतकर, लक्ष्मण बेकवाडकर, सूरज गोरल, यलाप्पा आ. पाटील, संजय गोरल, हणमंत पाटील, बळीराम देसूरकर, सुभाष मजुकर, रमेश धामणेकर, कृष्णा बिजगरकर, कृष्णा शहापूरकर, नंदकुमार पाटील, शिवाजी कदम, मधुसूदन पाटील, प्रकाश मालुचे, आण्णा संभाजी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.