• तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून होणाऱ्या मराठी सन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी, रविवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता राजहंसगड ते येळ्ळूर होणाऱ्या यात्रेमध्ये तसेच पुढील टप्प्यातील होणाऱ्या या यात्रेमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. मराठी सन्मान यात्रा यशस्वी करून केंद्र व कर्नाटक सरकारला जाग येऊन लवकरात लवकर सीमाप्रश्नाच्या सोडवण्यासाठी चालना मिळावी, यासाठी ही यात्रा यशस्वी करणे काळाची गरज आहे.

सीमाभागात मराठी भाषेवर भाषिक अत्याचार केले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मिळणारे हक्क डावलले जातात. भाषिक अल्पसंख्याक आयोगाने वारंवार सूचना करूनही या सूचनेकडे कर्नाटक सरकारचे साप दुर्लक्ष झाले आहे. सीमाभागातील सर्व सार्वजनिक ठिकाणी असणारे फलक आता कानडीकरण केले जात आहेत. तसेच सरकारी सर्व कागदपत्रे कानडी भाषेत आहेत. यामुळे सीमाभागातील मराठी नागरिकावर भाषिक अत्याचार सुरूच आहेत.हा अत्याचार दूर व्हावा व हा सीमाभागातील मराठी मुलुख महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा म्हणून गेली ६९ वर्षे हा लढा सुरू आहे.लोकशाहीच्या मार्गाने अनेक लढे सीमाभागातील मराठी भाषिकांनी लढले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आता मराठी सन्मान यात्रा काढून सीमाभागातील मराठी भाषिकांना एकवटून लवकरात लवकर सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी, यासाठी या मराठी सन्मान यात्रेमध्ये सर्व मराठी भाषिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे गरजेचे आहे.

रविवार दिनांक १५ मार्च पासून होणाऱ्या मराठी सन्मान यात्रे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर,मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील यांनी केले आहे.