• म. ए. समितीच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

बेळगाव / प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्याची सुनावणी येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्ना संदर्भात पुढील धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

इस्लामपूर (सांगली) येथे झालेल्या या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात राज्याचे सीमा समन्वयक मंत्री, उच्चाधिकार समिती, तज्ञ समिती तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, गोपाळराव देसाई, गोपाळराव पाटील, आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, एन. बी. खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.