• मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक
  • घटक समित्यांना जागृतीची सूचना

बेळगाव / प्रतिनिधी

भाषावार प्रांतरचनेनंतर अन्यायकारकरीत्या बेळगावसह ८६५ गावे कर्नाटकात समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात पाच मराठी भाषिक हुतात्मा झाले. त्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत्या १७ जानेवारी रोजी सीमाभागात हुतात्मा दिन अत्यंत गांभीर्याने पाळावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.

गुरुवारी पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. प्रारंभी सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई यांनी, दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील हुतात्मा चौक तसेच कंग्राळी खुर्द येथे हुतात्मा दिन पाळावा, असे सांगत घटक समित्यांनी बैठका घेऊन मराठी भाषिकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन केले. १७ जानेवारी हा दिवस सुतक दिन म्हणून पाळावा, असेही त्यांनी नमूद केले.

खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी सीमाप्रश्नाच्या सुनावणीला गती मिळत असल्याने यंदा सकारात्मक निकालाची अपेक्षा व्यक्त केली. ॲड. एम. जी. पाटील यांनी शहर समिती व तालुका समितीकडून होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सांगितले. तसेच हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी लक्ष्मण होनगेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरून एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बैठकीत मराठी सन्मान यात्रेबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांनी दिलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. सीमाप्रश्न, मराठी भाषा व संस्कृती युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार असून त्यास मध्यवर्ती समितीचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले.

तसेच येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या वतीने संघटनात्मक संभ्रमाबाबत निवेदन देण्यात आले असून, त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीला मोनाप्पा पाटील, अनिल पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, अजित पाटील, मनोहर हुंदरे, रावजी पाटील, विलास बेळगावकर, रणजीत चव्हाण-पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.