- उत्तर कर्नाटकावर अन्यायाचा आरोप
- गोवा – महाराष्ट्राला जोडणाऱ्या प्रवेशद्वाराकडे सरकारचे दुर्लक्ष
बेळगाव / प्रतिनिधी
दक्षिण भारतासह गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या बेळगावला अद्याप आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे, आधीच देवनहल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या बेंगळूरमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उत्तर कर्नाटकावर पुन्हा एकदा अन्याय झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
बेंगळूरनंतर कर्नाटकाची दुसरी राजधानी असलेल्या बेळगावकडे सरकारचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधीच कार्यरत असलेल्या देवनहल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळानंतरही बंगळुरूला दुसऱ्या विमानतळाची गरज आहे का, असा थेट सवाल नागरिकांनी केला आहे.
कर्नाटकचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला बेळगाव जिल्हा गोवा व महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारताला जोडणारा दुवा आहे. सुवर्ण विधानसौध, अद्ययावत विमानतळ, विद्यापीठे, पर्यटनस्थळे, केएलईसारख्या आंतरराष्ट्रीय करार असलेल्या शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानक यांसह आवश्यक सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असल्याचेही निदर्शनास आणले जात आहे.
या भागातील मोठ्या संख्येने नागरिक परदेशात प्रवास करतात. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी त्यांना सुमारे ५०० किलोमीटर दूर असलेल्या बेंगळूरला किंवा २५० ते ३०० किलोमीटर अंतरावरील गोव्याला जावे लागते. सध्या बेळगावहून बंगळुरू, दिल्ली, गोवा, तामिळनाडू यांसारख्या ठिकाणी विमानसेवा सुरू असून, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
तरीही उत्तर कर्नाटकाला आंतरराष्ट्रीय विमानतळापासून वंचित ठेवून सरकार सावत्रपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे बेंगळूरमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याचा निर्णय घेतला जात असताना बेळगावकडे दुर्लक्ष होणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांमुळे बेळगाव रेल्वे स्थानकाचे पुनरुज्जीवन आणि अद्ययावतीकरण झाले असून, शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याची मागणी अधिक तीव्र होत असून, सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.







