बेळगाव / प्रतिनिधी

सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, सावगाव येथे मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी विभागीय स्तरावरील प्रतिभा कारंजी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, वक्तृत्व, अभिनय या विविध कलाप्रकारांतून आपली कला सादर करत स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सागर सावगावकर यांनी भूषविले. ग्रामपंचायतीचे चेअरमन डॉ. वाय. एम. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनातून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. एस. गानगी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. पाहुण्यांचे पुष्पगुच्छांनी स्वागत करण्यात आले. स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या फाईल्स, प्रमाणपत्रे व पदकांचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी लागणारी प्रमाणपत्रे गावडू कोरजकर यांनी दिली असून पदकांची देणगी ग्रामपंचायतीचे चेअरमन डॉ. वाय. एम. पाटील यांनी केली. अर्जुन चौगुले यांनी कार्यक्रमासाठी ३ हजार रुपयांची मदत केली.

यावेळी विशेष सत्कार सोहळा पार पडला. कर्नाटक नाडरत्न आणि उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्राप्त डॉ. वाय. एम. पाटील तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शंकर बेन्नाळकर यांचा शाल, हार व टोपी घालून सत्कार करण्यात आला.

स्पर्धेसाठी बीआरपी श्री. बडीगेर, सीआरपी सतीश पाटील, तसेच उचगाव, हिंडलगा, मण्णूर, बेळगुंदी व मोरारजी देसाई शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, परीक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आय. जे. कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. संजय गौंडाडकर यांनी केले. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली चमकदार कला सादर केली आणि परीक्षकांच्या निर्णयानंतर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमासाठी शाळेचा शिक्षकवृंद, सीआरपी, एसडीएमसी तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.