बेळगाव / प्रतिनिधी
सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिर आणि परिसरातील डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाने २१५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ११८ कोटी, तर राज्य सरकारकडून ९७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, या माध्यमातून भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
या विकास योजनेत सुमारे ८ हजार भाविक सामावू शकतील असे भव्य संकुल उभारले जाणार आहे. याशिवाय एकाच वेळी ४ हजार भाविकांना बसण्याची सोय असलेला अत्याधुनिक भोजन कक्ष तयार केला जाणार आहे. डोंगरावर येणाऱ्या बैलगाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून, त्या ठिकाणी जनावरांसाठी चारा व पाण्याची सोयही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
भाविकांच्या सोयीसाठी २५ आधुनिक स्वच्छतागृह संकुलांची उभारणी केली जाणार असून, अनेक लहान-मोठ्या पूरक विकासकामांचाही समावेश या प्रकल्पात आहे. यासोबतच एक स्वतंत्र प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे.
या सर्व विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यकारी यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आले असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पामुळे सौंदत्ती येथील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.








