• तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मरिहाळ आणि काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीत छापे टाकून कायद्याचे उल्लंघन करत आणि जनतेला त्रास देत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

मरिहाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. तलवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोदगा गावात छापा टाकून सुळेभावी येथील गणपती होसमनी याला सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असताना अटक केली. दारूच्या बाटल्या आणि ग्लास जप्त करण्यात आले असून उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काकती पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक आणि मृत्युंजय माथा यांनी भुतरामनहट्टी येथील मुक्तीमठजवळ घातलेल्या अन्य एका छाप्यात वंटमुरी येथील कडप्पा वालिकर आणि उक्कड येथील दुर्गाप्पा नायक यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे गुन्हा आहे हे माहित असूनही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर बेळगाव शहर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. ही यशस्वी मोहीम राबवल्याबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशी कारवाई सुरूच राहील असे पोलीस सूत्रांनी सांगितले.