- विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलाविष्काराने रंगत ; गुणवंतांचा गौरव
येळ्ळूर : सरकारी मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात शैक्षणिक गुणवंतांचा सत्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडेकर होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा कौशल्य अभिवृद्धी केंद्राच्या निर्देशक आणि व्हीटीयू महिला घटक अध्यक्षा डॉ. संध्या राजन अणवेकर उपस्थित होत्या. बेळगाव ग्रामीणचे क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय आर. के., सीआरपी येळ्ळूर केंद्रप्रमुख श्री. महेश जळगेकर, येळ्ळूर वाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. पाटील यांच्यासह एसडीएमसी उपाध्यक्ष, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने भगवा फेटा, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती देवी, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन एसडीएमसी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर वरिष्ठ मुख्याध्यापक श्री राजेंद्र चलवादी यांनी प्रास्ताविक केले.
क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय आर. के. यांनी शाळेला मिळालेल्या कर्नाटका पब्लिक स्कूल दर्जाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना मोबाईल व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन केले. सीआरपी श्री महेश जळगेकर यांनी स्वरचित कविता सादर केली. डॉ. संध्या अणवेकर यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत शाळेने दिलेल्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षातील दहावी परीक्षेत येळ्ळूर केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही बक्षिसे प्रदान करण्यात आली. ‘भाग्यवान पालक’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुमारे २८ विविध विषयांवर आधारित नृत्य व नाट्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व आभार प्रदर्शन शिक्षकवृंदांनी केले. शेवटी लॉटरी पद्धतीने भाग्यवान पालक म्हणून श्री. उमेश पाटील यांची निवड झाली. या सोहळ्यास शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








