• ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील ‘सूरसम्राज्ञी’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत लोअर परळ या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही आनंद भोसले यांनी सांगितले.

  • आशाताईंची कारकीर्द :

आशा भोसले, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे. १९५० च्या दशकात त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचे खास स्थान निर्माण केले. ओ. पी. नाय्यर, आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.

त्यांनी क्लासिकलपासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषण सारखे सन्मान मिळवले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनिज बुकात सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचे गाणे कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही.