• महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आमदार अभय पाटील यांची टीका

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेत सांडपाणी वाहिनीच्या कामांसाठी निधी वाटप करताना उत्तर व दक्षिण बेळगावमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही केला.

सभेत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी कामांसंदर्भात माहिती मागण्यासाठी पत्रव्यवहार करतात, मात्र महापालिका अधिकाऱ्यांकडून त्याला वेळेत उत्तर मिळत नाही. या आडमुठ्या भूमिकेमुळे विकासकामांना अडथळे निर्माण होत असून जनतेच्या समस्या सुटत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवचरित्र उद्यानाजवळ बंद करण्यात आलेल्या रस्त्याबाबत बोलताना त्यांनी, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तो रस्ता किमान एका बाजूने तरी खुला करावा, यासाठी महापालिकेने विशेष समिती स्थापन करून अहवाल सादर करावा, अशी मागणी केली. तसेच एनजीटी योजनेअंतर्गत निधी वाटप करताना उत्तर व दक्षिण बेळगावला समान किंवा योग्य प्रमाणात निधी न देता सरकारला चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांडपाणी वाहिनीच्या कामांसाठी निधीचे वाटप योग्य पद्धतीने न झाल्याने अधिकाऱ्यांनी मनमानी केल्याचे दिसून येते. सरकारची दिशाभूल करून विकासकामांमध्ये भेदभाव करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि सर्व प्रभागांना समप्रमाणात निधी द्यावा, अशी ठाम भूमिका आमदार अभय पाटील यांनी मांडली.

या सर्वसाधारण सभेत विविध प्रभागांतील सदस्यांनी नागरी समस्या मांडल्या. यावेळी लोकप्रतिनिधींच्या पत्रव्यवहाराची गांभीर्याने दखल घेऊन अधिकाऱ्यांनी वेळेत व योग्य प्रतिसाद द्यावा, अशा सूचनाही आमदार पाटील यांनी दिल्या.