उचगाव / वार्ताहर
उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २५ वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १८ जानेवारी रोजी दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत होणार आहे. हा सोहळा दिमाखात पार पाडण्यासाठी उचगाववासीय सज्ज झाले आहेत.
माऊली, जि. सांगली येथील इंद्रजीत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात पुणे येथील डॉ. संजय उपाध्ये हे विनोदी शैलीमध्ये विचार मांडणार आहेत. यावर्षीही दुपारी उचगावच्या मध्यवर्ती गणेश- विठ्ठल-रखुमाई मंदिरांच्या प्रांगणातील गांधी चौकात सर्वांना गोड भोजनाची व्यवस्था केली आहे. तिसऱ्या सत्रात कथाकथन होणार आहे. यावर्षी जयवंत’ आनंदा आवटे हे प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. चौथ्या सत्रात झी मराठी हास्यसम्राट फेम प्रा अजितकुमार कोष्टी यांच्या विनोदी कार्यक्रमाचा आनंद साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.
या संमेलनाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन उचगाव साहित्य संमेलन अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, सेक्रेटरी एन. ओ. चौगुले, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी केले आहे.








