- नामवंत मल्लांचा सहभाग निश्चित
बेळगाव : सांबरा येथे येत्या २६ एप्रिल रोजी भव्य कुस्ती आखाडा भरवण्यात येणार आहे. याबाबत निर्णय कुस्ती कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला असून, आयोजनासाठी सर्व तयारी सुरू झाली आहे.
कुस्ती आखाड्याच्या नियोजनासाठी साई जिम येथे बैठक झाली, जिथे पैलवानांच्या जोड ठरवणे, देणगी जमा करणे, आखाडा भरवण्याचे ठिकाण व इतर आवश्यक तयारीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच उत्तर भारतातील नामवंत मल्लांना पाचरण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
यल्लाप्पा हरजी, लक्ष्मण सुळेभावी, महेंद्र गोठे, भरमा चिंगळी, नितीन चिंगळी, कृष्णा जोई, शीतलकुमार तिप्पाण्णाचे, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, भुजंग धर्मोजी, मोहन हरजी, शिवाजी मालाई, प्रवीण ताडे, सिद्राई जाधव यांसह कुस्तीगीर संघटनेचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढत असून, येत्या आठवड्यात होणाऱ्या या आखाड्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.








