- निवृत्त प्राचार्य शामराव पाटील
बेळगाव / प्रतिनिधी
“सुखाने , विचारणे आणि संस्काराने जगावे, जगता जगता समाजासाठी जे काही करता येणे शक्य असेल ते करत राहावे आणि जीवनात खूप मोठे व्हावे, अशा कार्यक्रमातून हे विचार घरी घेऊन जावे “असे मत रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य शामराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
श्री घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट आणि बी.के. बांडगी शैक्षणिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी परीक्षेत तालुक्यातील मराठी माध्यमांच्या शाळातून प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना रोख रकमेचा पुरस्कार, स्मृतीचिन्ह , वह्या आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्याचा कार्यक्रम रविवारी दुपारी मारुती मंदिराच्या बी. के. बांडगी सभागृहात संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शामराव पाटील हे उपस्थित होते. पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हे होते. अध्यक्षस्थानी मंदिराच्या ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष कुलदीप भेकणे, सेक्रेटरी प्रकाश माहेश्वरी आदी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते कै बांडगी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. ट्रस्टी अनंत लाड यांनी प्रास्ताविक केल्यावर चंद्रकांत बांडगी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते बेळगाव तालुक्यातील ३० शाळांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना रोख एक हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थिनींचा गौरव करून आमदार अभय पाटील म्हणाले की,” विद्यार्थिनीनो तुम्ही आज जे यश संपादन केला आहात त्यामध्ये तुमच्या गुरूंचे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत. म्हणून तुम्ही त्यांना विसरू नका. या पुढच्या काळात तुम्हाला अनेक मित्र-मैत्रिणी भेटतील आणि अनेक प्रलोभने येतील पण त्या प्रलोभनांना बळी पडू नका. आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असे कोणतेही काम करू नका. आपली भाषा, आपला समाज आणि आपल्या देशावर प्रेम करा. या ट्रस्टने आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. स्व. बी के बांडगी यांचे कार्य त्यांची मुले आणि ट्रस्टने पुढे चालू ठेवले आहे हे कौतुकास्पद कार्य आहे.”
शामराव पाटील यांनी आपल्या भाषणात अतिशय मौलिक विचार मांडले. दहावी नंतर घ्यावयाचे शिक्षण ही आपल्या कुवतीला झेपणारे, आई-वडिलाना परवडणारे आणि जीवनात यशस्वी करणारे असावयाला हवे. समाजासाठी काहीतरी करता यावे या भावनेतून कार्य करणाऱ्यांच जीवन सार्थक होते.” असे ते म्हणाले. “विद्यार्थिनींनी आपल्या जीवनाला दिशा देणारी आत्मचरित्रे वाचावीत ती तुमच्या जीवनात निश्चितच बदल घडवतील असे सांगून त्यांनी अनेक महान आत्मचरित्रांची उदाहरणे दिली.
बेळगाव तालुक्यात प्रथम आलेली महाराष्ट्र हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या मानकोजी हिच्यासह २७ विद्यार्थिनींना याप्रसंगी गौरविण्यात आले. तिचे कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. कार्यक्रमाचा समारोप रघुनाथ बांडगी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमास ट्रस्टी, विद्यार्थिनी , पालक व अनेक समाजसेवक उपस्थित होते. मंदिराचे नवे ट्रस्टी हिरालाल पटेल व सुनील सरनोबत यांचा आमदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.