- चारशेहून अधिक धारकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी
शनिवारी नवरात्रोत्सवातील सहाव्या दिवशी झालेल्या श्री दुर्गामाता दौडीला वरुणराजानेही हजेरी लावली. सततच्या पावसातही शेकडो भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत भक्ती आणि ऊर्जेचा अद्भुत संगम घडवला.
सदाशिवनगर येथील श्री हरिद्रा गणेश मंदिरातून कात्यायनी पूजेनंतर दौडीची सुरुवात झाली. प्रेरणामंत्रानंतर ध्वजारोहण करून दौड मार्गस्थ झाली. सदाशिवनगर मेन रोड, गणेश चौक, बेलदार छावणी, मरगाई मंदिर परिसर, नेहरूनगर, कोल्हापूर सर्कल, सुभाषनगर, वड्डरवाडी, रामनगर अशा प्रमुख मार्गांवरून पुढे अशोकनगर आणि शिवबसवनगर मार्गे श्री जोतिबा मंदिरात दौडीची सांगता झाली.

शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम असतानाही लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पावसात भिजत ओलेचिंब होऊन दौडीत सहभाग घेतला. चारशेहून अधिक धारकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. विविध ठिकाणी आरती व फुलांच्या वर्षावाने दौड स्वागत करण्यात आली.
उद्या (रविवार, २८ सप्टेंबर) शहापूर श्री अंबामाता मंदिरातून दौडीची सुरुवात होऊन गोवावेस येथील जगज्योती बसवेश्वर सर्कल येथे सांगता होणार आहे.
