• एनएसएसच्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

बेळगाव : अंमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना दूर ठेवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे जेएनएमसी परिसरात “Say No to Drugs” या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध विद्यापीठांतील २०० हून अधिक एनएसएस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अंमली पदार्थांविरोधात ठाम भूमिका व्यक्त केली.

राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस आणि KLE Academy of Higher Education and Research यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

“युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हेच अंमली पदार्थांविरोधातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे. आपण सर्वांनी मिळून निरोगी समाज घडवूया,” असे आवाहन क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी यांनी केले.

एनएसएस कार्यक्रम समन्वयक डॉ. अश्विनी नरसन्नवर आणि डॉ. आरती नेली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. मंजनाथ गड्डी (केएलई) यांचे सहकार्य लाभले. अध्यक्षा विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि सचिव रोटेरियन कावेरी करूर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे नेतृत्व रोटेरियन ॲड. दिव्या मुडिगौडर यांनी केले. रोटेरियन डॉ. स्पूर्ती मस्तिहोळी, शीला पाटील आणि सविता वेस्ने यांनी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.