बेळगाव : टिळकवाडी येथील आर्ष विद्या आश्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व पॅटसन मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आश्रमातील मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान आश्रमातील ४६ मुलींना किराणा साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले. तसेच मुलींच्या कल्याणासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. या वेळी मुलींशी संवाद साधण्यात आला आणि महिला दिनानिमित्त केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.
हा कार्यक्रम क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी त्यांनी आश्रमातील मुलींसोबत महिला दिन साजरा करणे आनंददायी असल्याचे सांगत त्यांच्या प्रोत्साहनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे नमूद केले. क्लबच्या सचिव कावेरी करूर यांनीही सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संयोजन आशा पाटील यांनी केले. यावेळी खजिनदार सुरेखा मुम्मिगट्टी, सविता वेसणे, आणि रोटेरियन डॉ. श्रीदेवी रेवण्णवर उपस्थित होत्या. पॅटसन मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष श्री. अनिल पाटील आणि पॅटसन समूहाच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले. महिला दिन साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे आर्ष विद्या आश्रमाचे आभार मानण्यात आले.







