बेळगाव / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे रविवार (दि. १४) रोजी शहरातील हॉटेल लक्ष्मी भवनमध्ये “टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड 2025” हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात अविस्मरणीय योगदान देणाऱ्या आणि भावी पिढी घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन अॅड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी, सचिव रोटेरियन कावेरी करूर आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन सुजाता वस्त्रद यांनी केले.
शैक्षणिक क्षेत्रात अपूर्व कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती सुवर्णा सिद्धान्नावर, श्रीमती माधुरी दोडमणी, श्री. दिलीप कुमार काळे, श्रीमती सिद्धाली सुरज पाटील आणि श्रीमती दीपा उळेगड्डी यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. भावी पिढीच्या घडणीत त्यांचे समर्पण आणि परिश्रम लक्षवेधी असल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी अध्यक्ष रोटेरियन अॅडव्होकेट विजयलक्ष्मी मण्णिकेरी म्हणाल्या, “शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत, ते विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करून समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवतात. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेला आणि दीर्घकालीन समर्पणाला सन्मानित करण्यासाठीच हा पुरस्कार देण्यात येत आहे.”
कार्यक्रमाला रोटेरियन सुरेखा मुम्मिगट्टी, लक्ष्मी चवळी, शीला पाटील, सविता वेसणे आणि आशा पोतदार यांसह अनेक मान्यवर रोटेरियन उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे आणि सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.