- २ रौप्य व ७ कांस्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई
बेळगाव / प्रतिनिधी
विशाखापट्टणम येथे भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्याचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी २ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण ९ पदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
देशभरातील विविध राज्यांतून अडीच हजारांहून अधिक खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. बेळगावच्या अवनीश कोरीशेट्टी याने १ रौप्य पदक जिंकले, तर सयी पाटील हिने १ रौप्य आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. तीर्थ पाश्चापूर याने २ कांस्य पदके पटकावली. याशिवाय खुशी घोटीवेकर, शेफाली शंकरगौडा, सोमय्या मंटूर आणि ऐश्वर्या संपगावी यांनी प्रत्येकी १ कांस्य पदक मिळवले.
हे सर्व खेळाडू केएलई संस्था तसेच गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








