• सीआरपीएफच्या भरधाव वाहनाची दुचाकीला धडक ; बैलूरचा शेतकरी ठार

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावहून तोराळी येथील सीआरपीएफ केंद्राकडे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने बैलूर येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दि. १६ रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. नामदेव गुंडू नाकाडी (वय ६७, रा. चव्हाट गल्ली, बैलूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हा अपघात बेळगाव–चोर्ला मार्गावरील रणकुंडये क्रॉसजवळील पेट्रोल पंपाजवळ झाला. नामदेव नाकाडी हे मंगळवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता दुचाकीवरून बैलूरहून बामणवाडी गावाकडे जात होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या सीआरपीएफच्या ट्रकने (क्रमांक टीएन ३७ सीजे ५८२७) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धडकेनंतर दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून नामदेव नाकाडी गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला जबर मार बसून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच दुपारी सुमारे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.

नामदेव नाकाडी यांनी बामणवाडी येथील शेतजमीन कसण्यासाठी घेतली होती. त्या शिवारात त्यांनी रताळीचे पीक घेतले होते. काढणीपूर्व पाहणीसाठी ते शेताकडे जात असताना काळाने घाला घातला. त्यांच्या निधनाने बैलूर परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर वडगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी ती लवकरच सुरळीत केली. नामदेव नाकाडी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार, दि. १७ रोजी सकाळी ९ वाजता बैलूरवाडा (ता. खानापूर) येथील स्मशानभूमीत होणार आहेत.

दरम्यान, बैलूर–तोराळी मार्गावर सीआरपीएफची वाहने वेगात धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांकडून केला जात आहे. या मार्गावर वेगमर्यादा व सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

  • आजारी पत्नीचा आधारवड हरपला…

नामदेव नाकाडी हे शेती व्यवसायावरच अवलंबून होते. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांची पत्नी रुक्मिणी नाकाडी या आजारी असून त्या घरीच राहतात. शेतातील कष्टातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ते पत्नीची देखभाल करीत होते. मात्र अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच पत्नीने एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळे आजारी पत्नीचा आधारवड हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • शेतकऱ्यावर काळाचा घाला…

सध्या शिवारात सुगीचा हंगाम जोमात सुरू आहे. रताळी पिकासाठी नामदेव नाकाडी यांनी वर्षभर काबाडकष्ट घेतले होते. आता काढणीचा काळ जवळ आला असताना नियोजनासाठी ते शिवाराकडे जात होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि कष्टकरी शेतकरी काळाच्या पडद्याआड गेला.

  • बैलूर परिसरात तीव्र संताप…

यापूर्वीही अनेकवेळा केंद्रीय राखीव दलाच्या वाहनांनी बैलूर–तोराळी रस्त्यावर शेतकऱ्यांची जनावरे, बैलगाड्या यांना धडक दिल्याच्या घटना घडल्या आहेत. सीआरपीएफची वाहने सुसाट वेगाने धावत असल्याच्या तक्रारी शेतकरी सातत्याने करत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी बैलूर परिसरातील नागरिक व शेतकरी करत आहेत.