• मुस्लिम नेते व नागरिकांसह बैठक, सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर

बेळगाव / प्रतिनिधी

आगामी रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सोमवारी मुस्लिम नेते व बांधवांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीचे अध्यक्ष पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे होते.

बैठकीत आयुक्तांनी नागरिकांना सण शांततेत आणि कायदेशीर नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, याची विशेष काळजी घेण्यावरही भर देण्यात आला. तसेच पोलीस प्रशासनाने सणाच्या काळात काही महत्त्वाच्या सुरक्षा सूचनाही दिल्या.

बैठकीस पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी तसेच शहरातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीसांनी नागरिकांना मदतीसाठी संपर्क साधण्याचे मार्ग स्पष्ट केले असून, सार्वजनिक जागांवर सुरक्षा व शांतता राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.