- धरणाचे दरवाजे सात इंचाने उघडून मार्कंडेय नदीत विसर्ग सुरू
बेळगाव / प्रतिनिधी
दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय रविवार (दि. १७) सायंकाळी चौथ्यांदा तुडुंब भरले आहे. जलाशयाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होऊन ती २४७६ फुटांवर पोचली. त्यामुळे, दोन दरवाजे सात इंचाने उघडून मार्कंडेय नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदा राकसकोप जलाशय चारवेळा तुडुंब झाले आहे.
रविवारी सायंकाळी जलाशय तुडुंब झाल्याने दोन आणि पाच क्रमांकाचा दरवाजा उघडून सात इंचाने विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या पावसाची संततधार कायम असून आणखी जोर वाढला तर इतर दरवाजेही उघडण्याची वेळ पाणीपुरवठा मंडळावर येणार आहे. गेल्यावर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जलाशय तुडुंब झाले होते. त्यावेळी, तीन दरवाजे दहा इंचाने उघडण्यात आले होते. सध्या विसर्ग पुन्हा सुरु झाल्याने मार्कंडेय नदीला पूर येण्याची शक्यता असून शेतकर्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाने पत्रकाद्वारे केले आहे.