• २७ पदकांची कमाई

बेळगाव : करावळी तायक्वांडो चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन कर्नाटक ऑलिंपिक असोसिएशनशी संलग्न राज्य तायक्वांडो संघटनेतर्फे करण्यात आले होते. कर्नाटक ऑलिंपिक असोसिएशन आणि इंडिया तायक्वांदोशी यांच्याशी संलग्न असलेल्या कर्नाटक तायक्वांदो यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच यक्षित युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने १ फेब्रुवारी २०२५ रोजी उडुपी येथील महात्मा गांधी जिल्हा स्टेडियम येथे ही स्पर्धा पार पडली. आयोजनाची जबाबदारी उडुपी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनने यशस्वीपणे सांभाळली.

कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ३५० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. किनारपट्टी भागात ऑलिंपिक क्रीडा प्रकार असलेल्या तायक्वांडोला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती राज्य संघटनेचे सरचिटणीस सी. जी. शशिवर्धन यांनी दिली. उद्घाटन सोहळा उडुपीचे आमदार यशपाल सुवर्ण यांच्या हस्ते झाला.

बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राव युवा ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण २७ पदकांची कमाई केली. शिस्तबद्ध खेळ, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढवला.

सब-ज्युनियर मुलांमध्ये घगन प्रेम शिवपुजीमठ (५० किलोखालील), वेदांत विनायक खडबडी (२५ किलोखालील), सिद्धार्थगौडा विरनगौडा गौरी (२७ किलोखालील), मोहम्मद सोहेब लतीफशाह चाँदशाह (३२ किलोखालील), ईशान सागर पाटील (२७ किलोखालील) आणि तक्श विजयमहंतेश गबसावळगी (२१ किलोखालील) यांनी सुवर्णपदके जिंकली. श्रेयसगौडा गौरी, स्मिथ नवखंडकर, अद्वित गोंड आणि दीप पाटील यांनी रौप्यपदके मिळवली; तर हर्ष वैष्णव आणि शौर्य पोटे यांनी कांस्यपदके पटकावली.

सब-ज्युनियर मुलींमध्ये श्राव्या शानभाग, सान्वी पाटील, निर्वी गाबसवलगी आणि सान्वी पोतदार यांनी सुवर्णपदके मिळवली. स्पूर्ती तालुकार आणि अनिका मुनवळी यांनी रौप्यपदके जिंकली; तर स्तुती टूमरी, सान्वी अन्वेकर, मन्श्विनी प्रजापती, झारा पीरजादे आणि अनन्या लोहार यांनी कांस्यपदके मिळवली.

कॅडेट गटात मोहम्मद शाफी चांदशाहा आणि आरुष टूमरी यांनी सुवर्णपदके जिंकली, तर प्रज्वल गूडस याने रौप्यपदक पटकावले. कॅडेट मुलींमध्ये मानवि पाटोले हिने सुवर्णपदकाची कमाई केली. या सर्व खेळाडूंना भारतीय वायू सेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद आर. राव यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत असून यक्षित युवा फाउंडेशन कडूनही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.